नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे सुजलॉन कंपनी व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज विरूध्द जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सुजलॉन कंपनी व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज ने आदिवासी व बिगर आदिवासींच्या जमिनी कोणती पूर्वपरवानगी न घेता त्याच्या वापर गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. त्यांच्या जमिनीवर वीज वाहक पोल ,रस्ते , रोहित असे उभारून जमिनीचा वापर १७ वर्षा पासून करीत आहेत. याबाबतीत अनेक दिवसापासून निवेदने ,मोर्चे धरणे आंदोलन करूनही शासनाने याची दखल घेतली नाही तसेच याबाबतीत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांनाही निवेदन देण्यात आले त्यांनी ३० दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.परंतु दोन महिन्याचे कालावधी होऊन देखील सुजलॉन कंपनीने आपले प्रशासन व आपल्या समितीची कुठली बैठक आजपर्यंत घेतली नाही त्यामुळे आदिवासींना अजून पर्यंत न्याय मिळाला नाही म्हणून सुजलोन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज विरोधात आज पवन ऊर्जा आदिवासी जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी मागासवर्गीय शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते.
८ ते १० दिवसात शेतकर्यांना न्याय मिळाला नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व यास सर्वस्व जबाबदार शासन राहील असे सांगण्यात आले. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले. यावेळी पवन ऊर्जा आदिवासी जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे, उत्तर महाराष्ट्र सचिव भीमसिंग पाडवी ,दामू भिल, कृष्णा मोरे ,साहेबराव भिल, सदाशिव पाडवी ,परभत पाडवी, अरुण वळवी, कत्थु भिल ,आप्पा बैसाणे ,भीमराव सामुद्रे, शामराव पाटील, संगीता पानपाटील, नानासाहेब ठाकरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते








