नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, नंदुरबार येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने ७ दिवशीय निवासी शिबिर कोळदा ता.जि. नंदुरबार येथे आयोजित केलेले असून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक अरविंद निकम यांच्या शुभहस्ते व न्यायाधीश डी.व्ही.हरणे, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कोळता गावाच्या सरपंच श्रीमती मोहिनीबाई वसावे, उपसरपंच आनंदभाई, ग्रामसेवक संजय पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य भरतभाई पटेल, माजी उपसरपंच सुभाष राजपूत, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, संस्थेचे सचिव यशवंत पाटील, समन्वयक डॉ.एम. एस. रघुवंशी, विधी महाविद्यालयातील प्राध्यापक आदि.उपस्थित होते. शिबीर हे नंदुरबार तालुका विधायक समितीचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा परिसरात करण्यात घेण्यात आले आहे.
शिबिरांतर्गत कायदा जागृती, आरोग्य मार्गदर्शन, ग्राम स्वच्छता, प्लास्टिक मुक्त अभियान इत्यादी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. माजी सैनिक श्री. निकम यांनी विद्यार्थ्यांना मस्करातील असलेल्या शिस्तीबद्दल जाणीव करून देत राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कसे विकसित होते याची उदाहरणे दिली. न्या.डी व्ही.हरणे यांनी अश्या शिबिरांमधून कायदा जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सुभाष राजपूत यांनी १९७४ मधील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील त्यांच्या सहभागाचा आठवणींना उजाळा देऊन शिबिराचे महत्व पटवून दिले. कार्यक्रम अधिकारी डॉ.के.एस मराठे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा.ललित माळी यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी, उपप्राचार्य श्री. चौधरी यांनी कार्यक्रमाचा आयोजनात मोलाचे सहकार्य केले.








