नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव शहादा रस्त्यावर मांडवी गावाजवळ दारू बनविण्यासाठी चारचाकी वाहनातून अवैधरित्या स्पिरीटची वाहतुक करणार्या वाहनासह २०० लिटर स्पिरीट जप्त केले असून याप्रकरणी धडगांव पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव शहादा रस्त्यावर मांडवी गावाजवळ गिरधर डेमर्या पावरा याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा मॅक्स वाहन (क्र.एम.एच.२३-५२५८) या वाहनात अवैध दारूसाठी लागणारे स्पिरीटची चोरटी वाहतुक करतांना पोलीसांना आढळून आला. पोलीसांनी ६० हजार रूपये किंमतीचे २०० लिटर स्पिरीट, ३ लाख रूपये किंमतीची गाडी असा ऐकूण ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोशि गणेश मराठे यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात गिरधर डेबर्या पावरा रा.भरड (ता.धडगांव), जहागीर दाज्या वसावे रा.अक्राणी (धडगांव), लालू पावल्या वासकेल रा.अकडीया वाकनेर (मध्यप्रदेश) यांच्या विरूध्द भादंवि कलम ३३८, महादारूबंदी अधिक क.६५ (ई) १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक आय.एन.पठाण करीत आहेत.








