नंदूरबार l प्रतिनिधी
आम आदमी शेतकरी संघटनेने शेत मालाच्या सेबी अंतर्गत होणार्या वायदे बाजारावरील बंदी उठविण्यासाठी सेबी व केंद्र सरकारला विनंती केली होती. त्या अनुषंगाने आम आदमी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना यांच्या दबावामुळे सेबीने व एमसीएक्स या संस्थांनी कपाशी पिकाचे वायदे बाजार पुन्हा सुरु करणे तसेच वायदे बाजारात पूर्वी फक्त धनदांडग्यांना शेतमालाचा वायदे बाजाराचा व्यवहार करता येत होता. परंतू आता एमसीएक्स व सेबीच्या नवीन धोरणानुसार लहान व्यापार्यांना सुद्धा शेती पिकांच्या वायदे बाजारात होणार्या सौद्यांमध्ये भाग घेण्यासाठी परवानगी दिली असल्याने कापसाच्या बाजाराला तेजी येण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलेले दिसत आहे.
सेबी व एमसीएक्सने जाहीर केलेल्या पत्रकानुसार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रत्यक्ष कपाशीचे सौदे सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच इतर शेतमालाच्या सौद्याच्या संदर्भातही सकारात्मक भुमिका घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम आदमी शेतकरी संघटना दि.६ फेब्रुवारी २०२३ शेतकर्यांच्या कपाशी पिकाच्या रखडलेल्या बाजार भावाविषयी व केंद्र सरकार व सेबीने वायदे बाजाराला जी बंदी आणली होती, ती बंदी उठविण्याबाबत रास्ता रोको आंदोलन करणार होते. परंतू सेबी व एमसीएक्सने जाहीर केलेल्या अधिसुचनेनुसार कपाशी या पिकाचे वायदे बाजार सुरु आहेत, असे आश्वास दिले आहे.
तसेच इतर पिकांच्याबाबतीत केंद्र सरकार व सेबीने सकारात्मक भुमिका घ्यावी, असे आवाहन करीत आहोत. आम आदमी शेतकरी संघटना आपले आंदोलन तुर्त स्थगित करीत असून दि.१३ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन, तूर, हरभरे, भात व इतर पिकांबाबतीत वायदे बाजार सुरळीत सुरु झाला नाही, तसेच शेतमालाच्या बाजार भावात सुधारणा झाली नाही तर आम आदमी शेतकरी संघटना पुन्हा दि.१३ फेब्रुवारी २०२३ नंतर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेईल.