नंदुरबार ! प्रतिनिधी
शासनाच्या आदेशानुसार कोविडमुळे शाळा बंद असल्या कारणाने शालेय पोषण आहार अंतर्गत देण्यात येणारे धान्य ऐवजी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून डायरेक्ट बेनिफिट ट्रांफरद्वारे विद्यार्थी यांचा बँक खात्यावर थेट रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांचे संयुक्त बँक खाते उघडण्याचा आदेश शिक्षण विभागाकडून काढण्यात आला आहे.काही पालक बँकेत खाते उडण्यासाठी गेले असता काही राष्ट्रीयकृत बँका ५०० ते २००० रुपये खाते सुरू करण्यासाठी खात्यात जमा करण्यास सांगत आहेत तरी विद्यार्थ्यांचे पोषण आहार अंतर्गत बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्याचे आदेश द्यावे अशी मागणी हिंदु सेवा सहाय्य समितीतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा कारणाने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत जेमतेम आता कुठे रोजगार सुरू होत आहेत, त्यातच पाल्याचा बँक खात्यासाठी एवढी रोख रक्कम गरिबांनी आणायची कुठून? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यातच शासन- प्रशासन सामाजिक अंतर ठेवण्यासाठी सांगत असतांना विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी ३० जून पर्यंतची मुदत दिली असल्याने बँकेत पालक प्रचंड गर्दी करत आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता आणि पालकांची आर्थिक परिस्थिती बघता आपण बँकांना विद्यार्थी यांचे बँक खाते शुन्य बॅलन्सवर सुरू करावे असा आदेशबँकांना द्यावा तसेच खाते उघडण्यासाठी समय मर्यादा १० जुलैपर्यंत शाळांना वाढवून द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनवार हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, पंकज डाबी, जगदीश जगताप, नरेश जिनगर यांच्या स्वाक्षर्या आहेत.