अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेले वाळू चे डम्पर नंदुरबार तहसील कार्यालयात घेवून जात असतांनाचालकानेच पळवून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , डम्पर ( क्र.एम.एच. ०५ एएम ३०७९ ) वरील चालक त्याच्या ताब्यातील डम्पर घेवून जात असतांना त्यात वाळू आढळून आली .जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक प्रमुख यांच्या पथकाने सदरचे डम्पर अडवून त्यातील वाळू वाहतूकीच्या पावत्या मागितल्या असता पावत्या आढळून आल्या नाहीत . अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सदरचे डम्पर संबधित पथकाने जप्त करुन पळाशी येथील तलाठी बाळू दादाभाई धनगर यांच्या ताब्यात दिले . यावेळी चालक सागर पाटील हा सदरचे डम्पर नंदुरबार तहसील कार्यालयात घेवून जात असतांना त्याने तहसील कार्यालयात न नेता हॉटेल जाईश्वर जवळून डम्पर पळवून नेले . ८ लाख रुपये किंमतीचे डम्पर व त्यातील १६ हजार किंमतीची ४ ब्रास वाळ असा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी तलाठी बाळू धनगर यांच्या फिर्यादीवरुन डम्पर चालकाविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत .