शहादा l प्रतिनिधी
शहादा-मंदाणे मार्गावर असलेल्या कर्जोत गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भोंगरे येथील तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून या अपघात प्रकरणीअज्ञात वाहन चालका विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शहादा-मंदाणे राज्यमार्गावरील कर्जोत गावाजवळ वीटभट्टी नजीक एक तरुण रक्तबंबाळ होवून मृतावस्थेत असल्याचे रविवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मयत तरुण हा भोंगरे येथील गणेश विजय अहिरे ( वय २२) असल्याची ओळख पटली. गणेश हा एक महिन्यापासून नंदुरबार येथे कामाला होता . शनिवार दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी भोंगरे गावाकडे मेहुण्यांसोबत प्रकाशा पर्यंत आला. तेथून तो मेहुण्यांना परत पाठवून एकटाच गावाकडे निघाला. शहादा येथील गाडी मिळाली नसल्याने त्याने पायीच रस्ता धरला. मिळालेल्या माहितीनुसार त्याने मंदाणे गावाकडे जाणाऱ्या वाहनांना हात देवून थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु रात्र असल्याने वाहन कोणीही थांबविले नाही. गणेश हा रस्त्याने हात देत देत चालत राहिला. अशातच एका अज्ञात वाहन चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने रस्त्यावर पायी चालणाऱ्या गणेश विजय अहिरे रा.भोंगरा, ता.शहादा यास जोरदार धडक दिल्याने गणेश चा जागीच मृत्यू झाला.धडक दिल्यानंतर वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला.दुसऱ्या दिवशी दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी कर्जोत गावाजवळील विटभट्टीजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात पसरली.सदर घटनेची माहिती गणेशच्या परिवाराला मिळाल्याने परिवारातील सदस्यांनी आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली.मृत पावलेला आपलाच मुलगा असल्याची खात्री पटल्यानंतर विजय कथ्थू अहिरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालक विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे करीत आहे.