नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील लालपूर गावाच्या शिवारात मका , तूर व आंबाडी पिकांमध्ये गांजाची शेतीवर पोलिसांनी धाड टाकत सुमारे सव्वा दोन लाख रुपये किंमतीची १०२ झाडे हस्तगत करण्यात केली असून शेती कसणाऱ्या संशयितास अक्कलकुवा पोलिसांनी अटक केली आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथील सत्तर पाया वसावे उर्फ सत्तर महाराज याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . त्यानुसार पोलिसांनी सत्तर वसावे हा लालपूर गावाच्या शिवारात कसत असलेल्या तूर , मका व आंबाडीच्या शेतात धाड टाकली . यात मका व आंबाडीच्या पिकाच्यामध्ये गांजासदृष्य ओलसर हिरवट रंगाच्या मातीसह काही झाडे आढळून आली . पोलिसांनी सदरची झाडांची मोजणी केली असता ती १४४ इतकी आढळून आली . यामुळे पोलिसांनी २ लाख २६ हजार ८१६ रुपये किंमतीची २८ किलो ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली . याप्रकरणी संशयित सत्तर वसावे यास अटक करण्यात आली आहे . अक्कलकुवा पोलिस ठाण्यातील पोकॉ.राणीलाल भोये यांच्या फिर्यादीवरुन संशयित सत्तर वसावे याच्याविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १ ९ ८५ चे कलम ८ ( क ) , २० ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास अक्कलकुवा पोलिस निरीक्षक आर.एन.शिंगटे करीत आहेत .