नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तर राजमाता जिजाऊ यांची जयंती सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तर प्रमुख अतिथी म्हणून दिपक धनगर, लेखाधिकारी वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय नंदुरबार, तसेच व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण, उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे आदी होते.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. प्रास्तविकातून प्रशांत जानी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. पाहुण्यांचा परिचय व सत्कार राजेंद्र लांडगे यांनी घडवून आणला. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने शाळेत वकृत्व स्पर्धा घेण्यात आली व त्यातील क्रमांक पात्र विद्यार्थी प्रथम मोहित मराठे, द्वितीय सार्थक पवार, तृतीय गौरव भावसार या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर आपले वक्तृत्व सादर केले. तसेच उत्तेजनार्थ चेतन मराठे, दुर्गेश गाभणे या विद्यार्थ्यांनाही पारितोषिक मिळाले.
सदर कार्यक्रमांमध्ये राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा आर्या वसईकर तर स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा देवेंद्र चित्रकथी या विद्यार्थ्यांनी सादर केली. चित्रकला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी यांनी उत्कृष्ट अशी वेशभूषा सजावट घडवून आणली.
प्रमुख अतिथी दिपक धनगर यांनी राजमाता जिजाऊ नसत्या तर आज हिंदवी स्वराज्य स्थापन झाले असते काय व स्वामी विवेकानंद, ज्यांनी हिंदू धर्माची पताका साता समुद्रापार फडकवली… इत्यादी अभ्यासपूर्ण असे मनोगत विद्यार्थ्यांसमोर सादर केले. तर अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातून विद्यार्थ्यांनी धडे घ्यावे व आपणही आपले जीवन त्यांच्या समान कर्तुत्वाने फुलवावे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार नांद्रे तर आभार प्रदर्शन भरत पेंढारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.