नंदूरबार l प्रतिनिधी
मोटार सायकल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली असून 3 लाख 35 हजार रुपये किमंतीच्या 9 दुचाकी जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, 8 जानेवारी 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव असे त्यांच्या न्युबन येथील एक साथीदाराच्या मदतीने तळोदा, शहादा परिसरातून मोटार सायकली चोरुन आणून शहादा येथील तौसिफ शेख यास विक्री करतात अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतांवर लक्ष ठेवून माहिती घेणे सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव यांची माहिती काढली असता, दोन्ही संशयीत इसम नेहमी वेगवेगळ्या दुचाकी वाहन फिरवत असतात व त्यांना भेटण्यासाठी शहादा येथील एक अनोळखी व्यक्ती येत असतो अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 8 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास दर्शन कांतीलाल पाटील, मयुर किशोर जाधव दोन्ही रा. बोरद ता. तळोदा यांना ताब्यात घेत त्यांना मोटार सायकल चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी तळोदा, शहादा व म्हसावद येथे त्यांचा न्युबन येथील तिसरा साथीदार सागर चौधरी याच्या मदतीने मोटार सायकल चोरीबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच चोरी केलेल्या मोटार सायकली शहादा येथील तौसिफ शेख विक्री केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ न्युबन गाठून सागर उदेसिंग चौधरी रा. न्युबन ता. तळोदा या
तिन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवून तौसिफ शेख याचा शोध घेतला असता तो, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी येथून तौसिफ शेख भिकन शेख रा. संजेरी चौक, गरीब नवाज कॉलनी, शहादा यास ही अटक केली.
त्यास दर्शन पाटील, मयुर जाधव व सागर चौधरी यांनी चोरी करुन आणून त्यास दिलेल्या मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता त्याने त्या मोटार सायकली जुना खेतिया रोड येथील गॅरेजच्या पाठीमागे लपवून ठेवल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून तेथून 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 7 मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. त्याबाबत तळोदा पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, म्हसावद पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत 4 मोटार बाबत माहिती घेण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकुण 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 7 मोटार सायकली हस्तगत करुन 3 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या एका पथकाने 8 जानेवारी रोजी सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील टेंबे त. सा. येथील हंसराज बहादुर मालचे यास ताब्यात घेवून त्याने सारंगखेडा-टेंभा रस्त्यावरील एका नाल्याच्या पुलाखाली लपवुन ठेवलेल्या 45 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी मोटार सायकल जप्त केलेल्या आहेत. जप्त केलेल्या मोटार सायकल चोरीबाबत सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या 4 संशयीत आरोपीतांकडून एकुण 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 9 मोटार सायकल हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक बापु बागुल, सुनिल पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली आहे.