नवापूर सीमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षकांकडून अवैध वसूली करण्यात येत असल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस मधुकर नाईक यांनी केली असून याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनात म्हटले आहे की , सीमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षकांकडून वाहनांकडून तसेच ओव्हर डायमेन्शनल गुडस् माल असलेल्या वाहनाधारकांकडून अवैध मार्गाने पैशांची वसुली करुन सोडून दिले जाते.याबाबतची तक्रार दिली असतांनाही याची दखल घेण्यात आली नाही.शासनाचा महसुल बुडविला जात आहे . तसेच मोटार वाहन निरीक्षक यांनी स्वतःचे पंटर ठेवलेले आहेत . त्यांच्याकडुन एका दिवसात लाखो रुपये गोळा करुन स्विकृत केले जातात . वाहनचालकांकडुन अमाप पैशांची मागणी केली जात . पैसे दिले नाही तर वाहन चालकांना पंटर मारहाणदेखील करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे माल भरलेले असतांना खाजगी पंटर कमी वजनाची पावती देतात व वरचे पैसे संबंधित अधिकारी व पंटर आपसात वाटप करुन घेत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे . यामुळे वजन काट्याची तपासणी उपनियंत्रक व त्यांच्या निरीक्षकाकडून तपासणी करण्यात यावी आर्थिक नुकसान टाळण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे . संबंधितांची सखोल चौकशी करुन या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा नवापूर सिमा नाक्यावर कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण केले जाईल असा इशारा निवेदनातून मधुकर नाईक यांनी दिला आहे .