नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिकांची पंचवार्षिक मुदत दि.३१ डिसेंबर रोजी संपल्यानंतर आता तिघा पालिकांवर संबंधित पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासकपदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी दिले आहेत. त्यामुळे आता तिघा पलिकांवर प्रशासकराज असणार आहे.
नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकांची पंचवार्षिक मुदत दि.३१ डिसेंबर रोजी संपली. प्रत्येक पंचवार्षिकप्रसंगी मुदत संपण्याआधीच निवडणूका घेतल्या जात होत्या. मात्र सद्यस्थितीत राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजीच संपली होती. मात्र त्यानंतर कोरोना, ओबीसी आरक्षण व त्यापुढे राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शहादा पालिकेची निवडणूक होवू शकली नाही.
यामुळे शहादा पालिकेवर गेल्या वर्षभरापासून प्रशासकराज आहे. तर आता शहादा पालिकेपाठोपोठ नंदुरबारसह तळोदा व नवापूर या तिघा पालिकांची मुदत दि.३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने प्रधान सचिवांनी संबंधित मुदत संपलेल्या पालिकांवर येथे संबंधित मुख्याधिकाऱ्यांना प्रशासकपदी नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. सदरचे आदेश दि.३० डिसेंबर रोजीच निर्गमित करण्यात आले होते. मात्र दि.३१ डिसेंबर २०२२ व १ जानेवारी २०२३ असे दोन्ही दिवस सुटी असल्याने सदरचे आदेश प्राप्त होवू शकले नव्हते.
मात्र काल सदरचे आदेश संबंधित मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार नंदुरबार पालिकेवर मुख्याधिकारी अमोल बागुल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नवापूर पालिकेचा अतिरीक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे दि.६ जानेवारीपर्यंत सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तळोदा पालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी सपना वसावा यांची नियुक्ती करण्यात आली आहेे.








