म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथील संत कबीर भजनी मंडळातर्फे नियमित भजन कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात येत असतात.भजनी मंडळाच्या माध्यमातून गावात जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात येत असतात.यामुळे
भजनी मंडळाच्या माध्यमातून गावात आध्यत्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असते. येथे गेल्या 20 वर्षांपासून या मंडळाचे कार्य सुरू असून, परिसरात कुणाकडेही सुख-दुःखाच्या प्रसंगी धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सवात कुठलाही मोबदला न घेता हे भजनी मंडळ सहभागी होते. दरम्यान, भजनी मंडळाकडून युवकांना विशेषकरून व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असल्यास युवकांनी व्यसनापासून दूर राहायला हवे असे सांगण्यात येत असते.सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेली असल्याने गंभीर असल्याचे भजनी मंडळाच्या माध्यमातून सांगण्यात येत असते.संत कबीर भजनी मंडळाने आपली शेती व शेतमजुरीसह गेल्या वीस वर्षापासून आजतागायत शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची ही जनजागृती करून त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या भजनी मंडळाकडून केले जात आहे यात रमेश भील, भिकू भील, गुलाबी भील,बयद्राव भील, छोटू भील, दिलीप भील, रतीलाल भील, हसेन मालचे, एकनाथ भील,प्रकाश भील, किसन भील, रतिलाल संतु भील या कलाकारांचा समावेश आहे.








