नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आरटीओ नाक्याजवळ ऊसाने भरलेल्या ट्रक आयशर वाहनाच्या टपला घासून गेल्याने २२ वर्षीय तरुण खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत होवून मृत्यू झाला. तर आयशरमधील सहा प्रवासी जखमी झाले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धुळे तालुक्यातील शिंदखेडा येथील साबरहट्टी भिलाटी येथील कल्पेश रमेश कुवर हे त्यांचे ठेकेदार नरेश शाम भील यांच्या मुलाच्या जावुळसाठी देवमोगरा माता येथे कार्यक्रमाला आयशर वाहनाने (क्र.एम.एच.१८ बीजी १८८१) शिंदकेडा येथून ७५ प्रवाशांना घेवून जात होते. यावेळी सागबाराकडून ऊसाने भरलेल्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून खापर आरटीओ नाक्याजवळ आयशर वाहनाच्या उजव्या बाजूला टपला घासून गेल्याने रविंद्र देवानंद सोनवणे (वय २२, रा.साबरहट्टी ) ता.शिंदखेडा जि.धुळे हा तरुण खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
तसेच आयशर वाहनातील सहा जणांना गंभीर दुखापत झाली. याबाबत कल्पेश कुवर यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १७७, १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.उल्हास ठिंगळे करीत आहेत.