नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पुर्वोत्तर भागातील तसेच मध्य प्रदेशच्या सीमालगतच्या गावातील जावदे मंदाणे असलोद दूधखेडा या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या मजबुतीकरणासह रुंदीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सीआरआयएफ योजनेअंतर्गत मंजूर केला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. राजेश पाडवी यांनी दिली.
तालुक्यातील पूर्वोत्तर भागातील अनेक गावाचा थेट संबंध मध्य प्रदेश राज्याशी जोडला जातो या भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी मध्य प्रदेश मध्ये जातात मात्र जावदा ते भम्राटा नाका यादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याने येथील शेतकर्यांसह नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता खराब रस्त्यामुळे वारंवार वाहन नादुरुस्त होणे यामुळे आर्थिक भुर्दंड सोसण्यासह रस्त्यावरून मार्गक्रमण करताना खड्ड्यांमुळे वाहन चालक व सहप्रवाशांना पाठी मानेचे दुखणे होणे अशा अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता यामुळे या महत्त्वपूर्ण रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांसह नागरिकांनी आ.राजेश पाडवी यांच्याकडे केली होती.
शेतकरी व नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी केंद्र शासन व राज्य शासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू ठेवला होता या पाठपुरावाला यश येऊन १२ डिसेंबर रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जावदे – मंदाना- असलोद -दुधखेडा या प्रमुख जिल्हा मार्गावरील मंदाणे जावदा ते मध्य प्रदेशाच्या सीमा लगाच्या भम्राटा नाका या रस्त्याच्या मजबुतीकरणासह दुरुस्तीसाठी सी आर आय एफ योजनेअंतर्गत सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे याबाबतचे पत्र केंद्रीय मंत्र्यांनी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवालयास दिले असून निधी हस्तांतरित केला असल्याने येत्या काही दिवसातच या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाणार असून परिसरातील शेतकरी व नागरिकांना याचा दळणवळणासाठी लाभ होणार असल्याची माहिती आ.राजेश पाडवी यांनी यावेळी दिली.