नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील आज मतदान होणाऱ्या ११७ ग्रामपंचायतींपैकी धडगाव तालुक्यातील पाच व अक्कलकुवा तालुक्यातील चार अशा अतिदुर्गम भागातील नऊ गावांसाठी सकाळी ७:३० ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.
धडगाव तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील उडद्या, भादल,भमाणे, सावऱ्यादिगर व भाबरी या गावातून परततांना नदीतून प्रवास करावा लागतो.तसेच काही अंतर जंगलातूनदेखील चालावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांना सायंकाळी मतदान संपल्यानंतर परततांना रात्र होत होती.यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.याबाबत तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला होता.त्यानुसार मतदानाच्या वेळेत बदल करण्याचे नमूद करण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांचे हाल होवू नयेत तसेच रात्री परततांना संभाव्य अडचणी लक्षात घेवून सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे धडगाव तालुक्यातील नमूद गावांमध्ये दुपारी ३:३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.तसेच अक्कलकुवा तालुक्यातीलदेखील चार गावांचा समावेश आहे.यात नर्मदा किनारपट्टीवरील मनिबेली,डणेल, धनखेडी व जामठी या गावांचा समावेश आहे.सदरच्या चार गावांमध्ये दुपारी ३:३० वाजेपर्यंत मतदारांना हक्क बजाविता येणार असल्याची माहिती तहसिलदार रामजी राठोड यांनी दिली आहे.