नंदुरबार l प्रतिनिधी
चांदसैली जवळील पिपलाकुवा येथील महिला सिबलीबाई पाडवी यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असून दरडीखाली सापडल्याने झालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
अक्राणी तालुक्यातील पिपलाकुवा येथील सदर महिलेला तिच्या कुटुंबियांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील अधिपरिचारिकेने रुग्णास तपासले असता ती महिला शुद्धीवर नव्हती आणि रक्तदाब आणि पल्स लागत नव्हते. महिलेचे संपूर्ण शरीर थंड पडून कडक झाले होते. त्यावरून रुग्णालयात येण्यापूर्वीच महिला मृत झाल्याची खात्री अधिपरिचारिकेची झाली असल्याने त्याबाबत सोबतच्या व्यक्तींना कल्पना देण्यात आली.
रुग्णास मृत अवस्थेत आणल्याने पोलिसांना कळवून पुढील कार्यवाही करावी लागेल व त्यासाठी केसपेपर काढावा अशी सूचना अधिपरीचारकांनी केली. त्यावर ती व्यक्ती सदर महिलेस मोटर सायकलवर घेऊन गेली. याबाबत तळोदा पोलीस स्टेशनला कल्पना देण्यात आली. मृत महिलेची प्रकृती मंगळवारपासून उलटी व जुलाब होत असल्याने अस्वस्थ होती असे महिलेसोबत आलेल्या व्यक्तीनी सांगितले.
नागरिकांनी घटनेबाबत कोणतीही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.चांदसैली घाटातील वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहितीदेखील प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.