नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातीलबालके ज्यांना गोवर रुबेला पहिली मात्रा किंवा गोवर रुबेला दुसरी मात्रा दिलेली नाही अश्या सर्व बालकांचे गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे.
या मोहिमेची पहिली फेरी दि.१५ डिसेंबर ते २५ डिसेंबर तसेच दुसरी फेरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे.गोवर रुबेला लसीचा चुकलेला डोस या विशेष लसीकरण मोहिमे मध्ये ९ ते १२ महिन्यांमध्ये गोवर रुबेलाचा पहिला डोस व १६ ते २४महिन्यांमध्ये गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी मनीषा खात्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार डॉ. संदीप पुंड यांच्या संनियंत्रनाखाली ही विशेष लसीकरण मोहीम राबण्यात येणार आहे.या करीता जिल्ह्यातील ६१ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९० आरोग्य उपकेंद्र पुरेश्या लस साठ्यासह सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.
गोवर प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस संदर्भात शहरी व ग्रामीण भागातील ९ महिने ते १२ महिने तसेच १६ महिने ते २४ महिने वयोगटातील पात्र लाभार्थीची माहिती संकलित करण्यात आली आहे.
वंचित बालकांना पहिला डोस व दुसरा डोस देण्यात येणार आहे मात्र दोन्ही डोस मधील अंतर किमान २८ दिवसाचे असले पाहिजे याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या डोस साठी ९६२ तर दुसर्या डोस साठी ३४६ अपेक्षित लाभार्थी आहेत व या मोहिमेकरिता ६२ लसीकरण सत्राचे आयोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
तरी जिल्ह्यातील राबवण्यात येणारी विशेष लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्तासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी मनीषा खात्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार रघुनाथ गावडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संजीव वळवी यांनी केले आहे.