नंदुरबार | प्रतिनिधी
आज महाराष्ट्रातील आदिवासींच्या घटनादत्त आरक्षणात वेगवेगळ्या जमातीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु असे कधीही होऊ देणार नाही आणि त्याकरिता जेव्हाजेव्हा आदिवासींमधील घुसखोरीचा विषय येईल तेव्हातेव्हा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी समाज म्हणून एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. संसदेत धनगर आरक्षणाच्या विरोधात उठवलेल्या लक्षवेधी प्रश्नाचे संदर्भ देत, महाराष्ट्रातील कोणत्याही जमातीला स्वतंत्र निधी किंवा दर्जा देण्याला विरोध नाही. परंतु आमच्या आरक्षणाला धक्का लावणे हे आम्ही सहन करणार नसल्याचे तसेच आदिवासींनी आपली ओळख टिकवण्यासाठी बोली भाषा टिकवणे आवश्यक असल्याचे मत खा.डॉ.हिना गावित यांनी व्यक्त केले.
निंबोणी ता. नवापूर तेथे संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना, महाराष्ट्र राज्य व विविध संघटनेच्या संयुक्त विद्यमान आयोजित ६ व्या राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलनाप्रसंगी खा.डॉ.हीना गावित बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आ.आमशा पाडवी, आ. शिरीष नाईक, भावना पवार, ऍड. राजश्री वळवी, यशवंत पवार, आर.टी.गावित, पंकज ठाकरे, रतिलाल कोकणी, सरपंच प्रमिला कोकणी, उपसरपंच छबीबाई वळवी, पोलिस पाटील मनीलाल कोकणी, भीमसिंग वळवी, चेतन खंबाईत, राजेंद्र पवार, डॉ.राहुल गावित, विजय अहिरे, विनित सूर्यवंशी, प्रा.सुलतान पवार, राजकुमार सोनवणे, पंकज ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी आ.आमशा पाडवी यांनी २०११ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत मूळ मालकालाच देशोधडीला करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आदिवासींनी अन्याय सहन करण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आज आपले युवक व्यसनाधीनतेकडे जात आहेत. त्यामुळे पालकांनीदेखील त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण व आरोग्य सुदृढ राहिले तरच भविष्यातील सर्व प्रकारच्या लढाया सक्षमपणे लढू शकतो, असे मत आ.शिरीष नाईक यांनी व्यक्त केले.
यावेळी पंकज ठाकरे, प्रा. सुलतान पवार, यशवंत पवार, भावना गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.
सायंकाळी कवी संमेलन घेण्यात आले. यात कवी साहित्यिक सुनिल गायकवाड, प्रविण पवार, शंकर चौरे यांनी सहभाग नोंदवला. रात्री आदिवासी संस्कृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील १६ सांस्कृतिक ग्रुप सहभागी झाले. यात आदिवासींच्या पारंपारिक नृत्य प्रकार यावर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या.
मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या स्पर्धेत अनुक्रमे देवळीपाडा ता. साक्री प्रथम, चिंचपाडा ता.सुरगाणा द्वितीय, धवळीविहीर ता.साक्री तृतीय व तीन उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाने अधिसंख्य पदांच्या बाबतीत घेतलेला निर्णय निषेधार्य आणि खर्या आदिवासीवर अन्यायकारी असून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणे आवश्यक आहे. त्यासोबतच न्यायालयीन लढादेखील तीव्र करण्याची गरज असल्याचे मत जि.प. सुहास नाईक यांनी व्यक्त. दौलत कोकणी, ब्रिजलाल कोकणी, विलास वळवी, संजय कांबळे, सुरेश कोकणी, संदीप कोकणी, दुर्गेश बोरसे, संतोष गावित, संकल्प युवा आदिवासी जागृती संघटनेचे सर्व पदाधिकारी, परिसरातील सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.