अक्कलकुवा | प्रतिनिधी-
शिवसेनेचा शिवसैनिक, शाखाप्रमुख सर्वोच्च पद आहे, लहान मोठे पद हे काम करणार्यांकरिता पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे काम नेहमीच न्यायदानाचे असते, नंदुरबार जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले आहे मात्र विकास कामे शून्य आहेत, असा आरोप माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षप्रवेश मेळाव्यात खापर येथे केला.
खापर येथील अंबिका माता मंदिर आवारात नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ व पक्ष प्रवेश सोहळा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, पंचायत समितीचे माजी उपसभापती इद्रापालसिह राणा, पं.स. सदस्य जेका पाडवी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख नवरतन टाक, जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे, खापर येथील माजी सरपंच जोलू वळवी, महिला आघाडीच्या तालुका संघटक सिंधुताई वसावे, संगीता पंजराळे, मनीषा नाईक, युवा सेना जिल्हा अधिकारी ललित जाट, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी आदी उपस्थित होते. श्री.रघुवंशी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचे काम करणार्या व्यक्तीची नेहमीच कदर केली जाते. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात व जिल्ह्यातील विकास काम तत्काळ व्हावे याकरिता स्थानिक नेत्याला मंत्रिमंडळात मानाचे पद दिले गेले आहे. मात्र, विकास काम शून्य दिसत आहे. विकासासाठी भरपूर योजना आहेत. मात्र साहेबांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषदे च्या निवडणूकप्रसंगी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे, असा पक्षादेश होता. मात्र दोघा पक्षांनी आमची फसगत केली. आणि निवडणूक स्वतंत्र लढवली. तरीदेखील सत्ता स्थापन करताना आम्ही त्यांना सोबत राहून आघाडी धर्म पाळला. युवा सेनेच्या पदांची जबाबदारी नुकतीच मिळाली आहे, त्यांनीदेखील कामावर बारकाईने लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावेळी युवासेनेचे नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यात युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाट, जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, युवसेना जिल्हा चिटणीस योगेश पाटील, युवा सेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई, सचिन पाडवी, युवा सेना अक्कलकुवा तालुका अधिकारी विरबहाद्दूरसिह राणा, युवा सेना नवापूर तालुका अधिकारी नरेंद्र गावित, युवा सेना धडगाव तालुका अधिकारी मुकेश वळवी, युवा सेना मोलगी ब्लॉक तालुका अधिकारी जयवंत पाडवी यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. आम आदमी पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य, कैलास वसावे, कॉंग्रेस पक्षाचे सलाउद्दीन हाशमी, किरण भावसार, हाजी हाफीज मक्रानी, मोतीलाल गुलाबचंद जैन, आजम फतेमोहम्मद मक्रानी, इमरान पठाण, ऍड.फुलसिग वळवी, जितेंद्र वसावे, मगण वसावे, आदिंनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रास्ताविक युवा सेना जिल्हा अधिकारी ललित जाट यांनी केले, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांनी सूत्रसंचलन केले. आभार जगदीश चित्रकथी यांनी मानले.