नंदुरबार l प्रतिनिधी
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा, पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानार्थ देण्यात येणाऱ्या विशेष गौरव पुरस्कारासाठी 10 ऑक्टोंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
कल्याणकारी निधी सुधारित नियम 2001 अन्वये राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात तसेच देशात तसेच राज्यांत पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच देशाची व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक व विधवा यांचे पाल्यांना आणि शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये महाराष्ट्र राज्यातून दहावी व बारावी मध्ये 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवुन उत्तीर्ण होणारे विद्यार्थींना दहा हजार रुपयांचा रकमेचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ, धुळे (दूरध्वनी क्रमांक 02562-237264) येथे संपर्क साधावा.