नंदुरबार l प्रतिनिधी
अल्पसंख्यांक व आदिवासी वर्गवारीत मोडणारा ख्रिस्ती समाज अनेक पंथांमध्ये विभागला गेला आहे. त्याच सोबत सर्व पंथीयांना एकत्र घेऊन चांगल्या प्रकारे समन्वय साधून समाजाच्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडण्याचे कार्य खऱ्या अर्थाने महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे प्रतिपादन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी केले. नंदुरबार येथील हिरा एक्झिक्यूटिव्ह हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व पंथीय ख्रिस्ती बांधवांच्या कार्यशाळेत व पदग्रहण सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा मराठी साहित्यिक व इतिहास संशोधक प्रा. डॉ. विश्वास वळवी, कार्याध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुरज गावित, उपाध्यक्ष लक्ष्मण पाडवी, सरचिटणीस सतीश वळवी, समन्वयक डॉ. निलेश वळवी, सल्लागार पा. बाळू गावित, आदि मान्यवरांनी समाजातील अडचणी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केल्या.
श्री भोसले पुढे म्हणाले, राज्यात व देशात ख्रिस्ती धर्मियांवरील वाढत असलेले अत्याचार, समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, शासकीय व निम शासकीय योजनांचा लाभ मिळावा, शैक्षणिक दृष्ट्या राज्यातील विद्यार्थ्यांना दिशा देणे, राजकीय प्रवासात समाजाला सामावून घ्यावे आदी महत्त्वपूर्ण प्रश्नावर बैठकीत विचार विनिमय करून कामासंदर्भातला आराखडा तयार करण्यात आला. तर इथून पुढे ख्रिस्ती समाजाला कुणीही ग्राह्य न धरता समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी ही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.
जिल्ह्याध्यक्ष म्हणून विश्वास वळवी यांनी आपल्या मनोगतात म्हटले “ख्रिस्ती समाज हा बुद्धिवादी असून नवचैतन्यवादी समाज आहे आणि राष्ट्रबंधुत्व जपण्यात नेहेमी आघाडीवर असतो.त्यासाठी ख्रिस्ती समाजातील लोकांनी सर्वच क्षेत्रात उतरून समाजाच्या व देशाच्या कल्याणार्थ झटावे व आपली भूमिका विशद करावी असे आव्हान केले.यासाठी सर्व पंथभेद विसरून सर्व जाती-संस्था-पंथांनी एकत्र यावे व देशाला बळकटी द्यावी जेणेकरून भविष्यात ख्रिस्ती समाजाचे एक चांगले चित्र आपल्यांना रंगविता येईल.
यावेळी जिल्हा कार्यकारणी बरोबरच नंदुरबार तालुकाध्यक्ष राजेश पाडवी, नवापूर तालुकाध्यक्ष रमेश गावित, शहादा तालुकाध्यक्ष पा. सुभाष पावरा, तळोदा तालुकाध्यक्ष विष्णू भिल्ल, धडगाव तालुका अध्यक्ष झुमा पराडके, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष चामाऱ्या वसावे, आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांना अनिल भोसले व प्रा. डॉ. विश्वास वळवी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच या बैठकीत मराठी साहित्यिक तथा इतिहास संशोधक प्रा. डॉ. विश्वास वळवी यांनी केलेल्या विशेष कार्याबाबत त्यांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यशाळेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ईश्वर गावित, सुमन गावित, आर.सी. गावित, सुभाष वसावे, मनोहर गावित, जयंतीलाल गावित, राजू गावित, याकूब गावित, विक्रम पाडवी, पा. शांताराम राऊत, एड. रणजीत गावित, मनोज वळवी, भीमसिंग वळवी आदींसह सर्वपंथीय ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश वळवी यांनी तर प्रा.डॉ.विश्वास वळवी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.