नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात लघुसिंचन योजनेच्या सहाव्या प्रगणना कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जलस्रोतांच्या प्रगणनेचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.एस.खोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी आर.के.नाईक, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जे.वाय.पाटील आदी उपस्थित होते.
प्रगणना करताना त्या प्रकल्पाची सद्यस्थिती, दुरूस्तीची आवश्यकता, उपाययोजना आदी माहितीदेखील सादर करावी. प्रगणनेच्या निमित्ताने अशी माहिती उपलब्ध झाल्यास आवश्यक दुरूस्तीची कामे जिल्हा वार्षिक योजना किंवा सीएसआरच्या माध्यमातून करणे शक्य होईल. विविध यंत्रणांच्या समन्वयाने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करावे. दर 15 दिवसांनी यंत्रणानिहाय कामाच्या प्रगतीची माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व गावातील जलस्त्रोतांची प्रगणना करण्यात येणार असून प्रत्येकाचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.