नंदूरबार l प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायालयीन लढा दिल्यानंतर यशाचे शिखर गाठण्यात यश आले असून अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे महत्वपूर्ण आदेश दिले.
याचिकाकर्ती मिनल उत्तम पाडवी, राहणार भगदरी, ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार, हिने सन २०१८ साली माननीय विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे विभाग, धुळे, यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. तरी देखील संबंधित अधिकारी यांनी नियुक्तीच्या संदर्भात कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला नव्हता. म्हणून याचिकाकर्ती हिने सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत रिट याचिका क्रमांक ५७११/२०२१ दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सदर प्रकरणात माननीय विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग, धुळे, यांना नोटीस बजावल्यानंतर सदर प्रतिवादी यांनी पत्रान्वये याचिकाकर्ते हिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कळविले होते. तसेच सदर कागदपत्रांची पडताळणी नंतर सदर मंजूर प्रकरण नेमणुकी करिता मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात येईल असे कळविले होते.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये सदर पत्राच्या संदर्भानुसार प्रकरण निकाली काढण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. सदर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही सदर अर्जावर कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्यात आल्यामुळे याचिकाकर्ते हिने माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक १३५१२/२०२१ दाखल केली असता माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( माननीय न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व माननीय न्यायमूर्ती एस. जी. दिघे ) यांनी आदेशान्वये दोन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आदेश पारित केले होते. त्या अनुषंगाने याचिकाकर्ती हिला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत महत्वपूर्ण आदेश पारित केले. न्यायालयीन लढा दिल्यानंतर यशाचे हे शिखर गाठण्यात यश आले. याचिकाकर्ते तर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.








