नंदुरबार l प्रतिनिधी
देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र अजूनही रेंगाळलेलाच असून राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे . संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने लसीकरणाचा निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून कोरोना रोखण्याच्या केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा , अशी मागणी भाजपच्या खा.डॉ.हीना गावीत यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .
याप्रसिद्धी पत्रकात खा.डॉ.गावित यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची मागणी करत म्हटले आहे की , ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे . याच वेगाने राज्यांनीदेखील लसीकरण करावे व निश्चित धोरण आखून राज्यातील सर्व नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी.याकरिता लशीच्या मात्रांचे नियोजनबद्ध वाटपही केंद्र सरकारने केले असून महाराष्ट्रास गरजेहून अधिक मात्रा उपलब्ध झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे . ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या . त्याऐवजी प्रत्यक्षात ९ १.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे . असे असतानाही राज्याच्या अनेक लसीकरण केंद्रांवरून आजही नागरिकांना हात हलवत परतावे लागत आहे तर अनेक केंद्रांवर लस नसल्याचे कारण देत ऐनवेळी लसीकरण थांबविले जात आहे . ठाकरे सरकारकडे लसीकरणाचा नेमका कार्यक्रम नाही आणि मोफत व सशुल्क लसीकरण वाटपाचे धोरणही नाही . त्यामुळे जनतेचे हाल सुरूच आहेत , असा आरोप खा.डॉ.हीना गावीत यांनी या पत्रकाद्वारे केला आहे . खाजगी केंद्रावर सशुल्क लसीकरण मात्र उपलब्ध असल्याने लसीकरणाच्या मोहिमेविषयी संशय व्यक्त होत असून सामान्य नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही खा.डॉ.हीना गावीत यांनी केला आहे . दरम्यान , लसीकरणाचे धोरणच नसल्यामुळेच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून कोरोना रोखण्याच्या राष्ट्रीय मोहिमेस पुन्हा महाराष्ट्रातून खीळ बसले , अशी भीती त्यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे .