नंदुरबार | प्रतिनिधी
औरंगपुर ते शहादा दरम्यान बालाजी वेफर्सच्या वाहनावर दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली असुन त्यांच्याकडुन साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुनिल संतोष तिरमले रा. नागसेन नगर, शहादा हे शहाद्यातील बालाजी वेफर्सचे व्यापारी अमित जैन यांच्या कडे मार्केटींग सेल्समन म्हणून काम करतात. १७ ऑक्टोंबर रोजी सुनिल तिरमले व बालाजी वेफर्सच्या वाहनावरील चालक अजय कैलास कोळी अशांनी शहादा तालुक्यातील विविध खेड्यागावांमध्ये बालाजी वेफर्सचा माल देवून त्यांच्याकडून पैसे घेवून सायंकाळी ६.१५ वा. सुमारास औरंगपुर मार्गे शहादा येथे परत येत असतांना औरंगपुर ते शहादा दरम्यान वळण रस्त्याच्या पुढे
अज्ञात ४ इसमांनी सुनिल तिरमले व अजय कोळी यांचे टाटा मॅजिक चारचाकी वाहनास थांबवून त्यांना चाकुचा धाक दाखवून फिर्यादी सुनिल तिरमले यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचे हातातील ८७ हजार ८७१ रुपये रोख असलेली रेग्झीनची पिशवी व ३ हजाराचा १ मोबाईल जबरीने हिसकावून मोटार सायकलने पळून गेले सुनिल संतोष तिरमले यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात अज्ञात आरोपीतांविरुध्द् भा.द.वि. कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत हे घटनास्थळी रवाना झाले. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तसेच धुळे जिल्ह्यातील नंदुरबारलगत असलेल्या पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी करण्याबाबत नियंत्रण कक्ष यांना आदेश दिले.
गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याचे ६ वेगवेगळे पथके तयार केले. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मागील महिन्यात औरंगपुर रस्त्यावर बालाजी वेफर्सच्या वाहनावरील मार्केटींग सेल्समॅन व चालकाला मारहाण करुन पैसे लुटणारी टोळी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील असून त्या वाहनावरील चालकाचा देखील गुन्ह्यात सहभाग आहे.
सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून वाहनावरील चालक अजय कोळी यास ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेे.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालाजी वेफर्सच्या वाहनावरील चालक अजय कोळी याचा कलसाडी गावात जावून शोध घेतला असता तो दोंडाईचा येथे गेल्याचे समजून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजय कोळी रा. कलसाडी ता. शहादा यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीताला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता अजय कोळी याने सदरचा गुन्हा त्याचा चुलत मामा भारत कोळी व त्याचे इतर साथीदार आकाश पाटील, ऋषिकेश गिरासे, आयुष मोरे व एक अल्पवयीन मुलगा सर्व रा. दोंडाईचा जि. धुळे अशांनी मिळून भारत कोळी याच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भारत भगवान कोळी रा. म्हाळसा नगर, दोंडाईचा, आकाश खंडू पाटील, ऋषीकेश ऊर्फ बिच्छु भगवान गिरासे दोन्ही रा. रा. संभाजी नगर डाबरी, दोंडाईचा, आयुष सुनिल मोरे रा. बामणे ता. शिंदखेडा, एक अल्पवयीन मुलगा यांना दोंडाईचा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्यांच्याकडून गुन्ह्यातील ८७ हजार ८०० रुपये रोख, २ लाख रुपये किमतीची दुचाकी गाडी, ५० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली डिस्कव्हर मोटार सायकल, गुन्ह्यातील चोरीस गेलेला ३ हजाराचा मोबाईल व गुन्ह्या करतेवेळी वापरलेला चाकू असा एकुण ३ लाख ४० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयीत आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत धुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईका विकास कापुरे, पोलीस शिपाई विजय ढिवरे, किरण मोरे, शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे.








