नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील आंबापाणी येथे शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने जमावाने घरातील सामानाची नासधूस करीत घराला आग लावत साहित्याची चोरी केली. या आगीत दोन दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य असे सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, आंबापाणी ता. शहादा येथे राहणारा वसंत रेंहज्या वळवी यांचे चुलतभाऊ टिल्या किल्या वळवी यास सुपारी देवून वसंत वळवी व त्यांच्या भावंडांनी खून केला असा आरोप करीत बिलज्या हुऱ्या वळवी, किल्या बोट्या वळवी, छगन किल्या वळवी, रमेश किल्या वळवी, सुभाष किल्या वळवी, आमश्या किल्या वळवी, पांडूरंग किल्या वळवी, रगन किल्या वळवी, मंगलेश किल्या वळवी, रगन किल्या वळवी या ९ जणांनी गाव कारभारी यांच्या सांगण्यावरुन वसंत वळवी यांच्यासह आई-वडील व भावंडांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. यामुळे वसंत वळवी व त्यांचे कुटूंबिय जीव वाचवून आंबापाणी गावातून पळून जात धडगाव येथे आले. मात्र आंबापाणी गावात संशयितांनी वसंत वळवी यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. तसेच घरातील १६ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ११ हजार ५०० रुपये किंमतीची ज्वारी, तुरडाळ, उडिद, चवळी, तांदुळ असे धान्य, १ हजार रुपये किंमतीचे दोन पंखे, १५०० रुपये किमंतीचे दोन सौर उर्जेचे प्लेट व दोन बॅटऱ्या असे साहित्य चोरुन नेले. तसेच घरात आग लावून नुकसान केले. या आगीत १० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.डी.ही.०३ ए ७६२२) व गुलाब वळवी यांची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.४१ बी ९२०६) या दोन दुचाकींचे नुकसान झाले. याबाबत वसंत वळवी यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात नऊ संशयिताविरोधात भादंवि कलम ४३६, ४५७, ३८०, १०९, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत.