नंदूरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील गव्हाळी सिमा तपासणी नाक्याजवळ अवैध दारूच्या वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी पथकाने कारवाई करीत 28 लाख 70 हजार रुपये किमंतीच्या बेकायदेशीर विदेशी दारु व बियरसह दहा लाखाचे वाहन जप्त केले आहे.याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारु तस्करांची माहिती काढुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे व अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी त्याबाबतचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्याच्या पथकाने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील गव्हाळी सिमा तपासणी नाक्याजवळ सापळा लावला 6 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साधारणपणे सायंकाळी सुमारे 5 वा. सुमारास सिमा तपासणी नाका येथे मर्यादेपेक्षा जास्त भार असलेले आयशर वाहन आले.
म्हणून सिमा तपासणी नाक्यावरील स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने त्या वाहनास थांबवून वाहन चालकाला वाहनात काय भरले आहे ? व वाहनाचे कागदपत्र बाबत विचारपुस केली असता तो वाहन चालक उडवा उडवीची उत्तरे देवू लागला, म्हणून सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने ते आयशर वाहन रस्त्याच्या बाजुला घेण्यास सांगितले. तसेच त्या आयशर वाहनाचे वजन केले असता त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन भरल्याचे दिसून आले. त्याच दरम्यान आयशरवरील वाहन चालकाने वाहन बाजुला घेवून तेथून पळ काढला.
स्थानिक गुन्हे शाखा व सिमा तपासणी नाक्यावरील पथकाने वाहनाची पाहणी केली असता त्यात
8 लाख 28 हजार रुपये किमंतीची MOUNT S-6000 SUPER STRONG बियरचे 500 एम. एल. चे एकुण 345 पत्राचे टिन व त्यामध्ये एकुण 8280 पत्राचे टिन. 20 हजार 16 रुपये किमंतीची रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिसकीचे एकुण 350 खोके, व त्यामध्ये एकुण 16,800 सिलबंद बाटल्या. 26 हजार 400 रुपये किमतीचे मुरमुरे भरलेल्या प्लास्टीकच्या एकुण 88 गोण्या आढळल्या.10 लाख रुपये किमंतीचे आयशर वाहन (क्र. MP-09 GE-6551) असा नंबर असलेले असा एकुण 38 लाख 40 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे आयशर वाहन इच्यावरील वाहन चालकाविरुध्द् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, जितेंद्र अहिरराव, अविनाश चव्हाण, किरण मोरे, तुषार पाडवी यांच्या पथकाने केली आहे.