तळोदा l प्रतिनिधी
धडगाव येथील वनविभागाच्या धडक कारवाईत बेकायदेशीररीत्या सागवानी लाकडाच्या खाटा विकणाऱ्या विक्रेत्यांकडून सुमारे २४ खाटा जप्त करण्यात आल्या. यात जप्त केकेल्या खाटाची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
धडगाव तालुक्यातील खेड्या पाड्यावरून शहरात बाजाराच्या दिवशी तयार सागवानी लाकडाच्या खाटा विक्रेते मोठ्या संख्येने येत असल्याची तक्रार होती. यावर वन विभागाने कारवाई सुरु करत शहरातील स्टेट बँकेसमोर तयार खाटा विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांकडून सुमारे २४ सागवानी लाकडाच्या खाटा ताब्यात घेत कारवाई केली. या कारवाईत जप्त केलेल्या खाटांची किंमत सुमारे एक लाख असल्याचे सांगण्यात आले.वन विभागाच्या या धडक कारवाई मुळे अवैध लाकडी वस्तू बनवून विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून अनेक खाटा विक्रेत्यांनी पोबारा केल्याने वन कर्मचाऱ्यांच्या हाती केवळ २४ खाटा लागल्या. दरम्यान वनविभागाने जप्त केलेल्या खाटांचा पंचनामा सुरु केला आहे. या पुढेही अशी धडक कारवाई सुरु ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्यावतीने कळविण्यात आले.