चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे तरुण युवकांतर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून आपुलकीच्या भावनेतून गरजू व गोरगरिबांना दिवाळी निमित्ताने दोनशे फराळ किटचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
सर्वत्र साजरा होणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. दिवाळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. मात्र काही कुटुंब अशी आहेत की ते केवळ आर्थिक परिस्थितीमुळे सण साजरा करू शकत नाहीत. मात्र त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी चिनोदा येथील तरुण युवक कपिल मराठे, अमृत मराठे, भूषण मराठे या युवकांनी स्तुत्य उपक्रम राबवित चिनोदा येथे दिवाळीनिमित फराळ वाटपासाठी हे तरूण युवक पुढे सरसावले व गरजू व गोरगरिबांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून हृदयापासून आम्हांलाही खूप आनंद असून या उपक्रमातून त्यांचीही दिवाळी आनंदमय झाली.
दिवाळीचा सण हा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दिवाळी साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे या उदात्त हेतूने चिनोदा येथील तरुण युवकांनी या दिवाळीला फराळ वाटपाचा उपक्रम राबवित दिवाळीच्या सणात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे असे या तरुण युवकांनी सांगितले. यावेळी चिनोदा येथील तरुण युवक कपिल मराठे, अमृत मराठे, भूषण मराठे, अमरसिंग वसावे आदी उपस्थित होते.








