नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतर थांबणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेद्वारे स्थलांतरीतांचे मॅपिंग करण्यात येणार आहे असे खा.डॉ.हीना गावित यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा परिषदेतील नवनियुक्त अध्यक्षांच्या दालनाच्या पुजेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलात्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या की, जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतर थांबणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेद्वारे स्थलांतरीतांचे मॅपिंग केल्यास स्थलांतर होणाऱ्या ठिकाणच्या अंगणवाडींमधून संबंधित बालकाला पोषण आहार पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्हा परिषदेसाठी मोठा निधी आणला जाईल. केंद्र सरकारकडून विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी निधी देण्यात कधीच हात आखडता न करता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला जात असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक गावाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व गावांना समान न्याय मिळवून त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होणार असल्याचे खा.डॉ.हीना गावित यांनी सांगितले.








