नंदूरबार l प्रतिनिधी
योजनांची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी येत्या मार्च २०२३ पर्यंत सुमारे एक लाख पदांची भरती करण्यात येणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा परिषदेतील नवनियुक्त अध्यक्षांच्या दालनाच्या पुजेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री डॉ.गावीत म्हणाले, रिक्त पदांचा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आहे. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने डिसेंबरपर्यंत एक लाख पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही अडचणी आल्याने आता मार्चपर्यंत सुमारे १ लाख जागा भरल्या जातील. त्यामुळे रिक्त असलेली ८० ते ९० टक्के पदे भरले जातील. यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदेदेखील भरली जाणार आहेत.
केंद्रासह राज्यातुन विकासासाठी जिल्ह्यात किती पैसा येतो, त्यापेक्षा योग्य नियोजन करुन खर्च करणे अपेक्षित असल्याचे यावेळी डॉग़ावित म्हणाले. आगामी काळात येणाऱ्या निधीत दऱ्या-खोऱ्यातील, वाड्या वस्तीतील रस्ते या कामांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगार, बचत गटांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासोबत जिल्ह्यात बांबू ,तेंदूपत्ता आदी उत्पादनाबाबत सर्वेक्षण केले जात असून जिथे पिकते तेथेच प्रोसेसिंग युनिटची स्थापना करण्याचा प्रयत्न आहे.
त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होणार आहे. जिल्ह्यात ९० टक्के स्थलांतर हे सिंचनाअभावी होतांना दिसत आहे. त्यासाठी सिंचनासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक भागात काय हवे यासाठी प्रत्येक गावांचा आराखडा आखला जात असल्याचे मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले.








