नंदुरबार l प्रतिनिधी
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदान करताना कधीही जात-धर्म बघितले जात नाही.आणि याचेच आदर्श उदाहरण मुकेश पाटील या युवकाने समाजासमोर ठेवले आहे.
मुक्ताईनगरची आठ वर्षाची चिमुरडी अफिफा शेख हिला एक वर्षापूर्वी ‘थॅलेसेमिया’ आजार असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिला दर महिन्याला एक पिशवी रक्त द्यावे लागते.
त्यात आफीफा हिचा रक्तगट बी-निगेटिव्ह असा आहे. सर्वदूर लसीकरण सुरू असल्यामुळे रक्तदात्यांची उणीव रक्तपेढींना भासते आहे. रक्तपेढींमध्ये रक्तसाठा अपुरा पडतो आहे. आफिफा हिचे उपचार जळगाव शहरातील गौरव महाजन या डॉक्टरांकडे सुरू आहे. या महिन्यात सुद्धा आफिफाला रक्ताची गरज भासली त्यासाठी रक्तदाता म्हणून मुकेश पाटील हा युवक पुढे आला.
मुकेशचा रक्तगट सुद्धा बी-निगेटिव आहे. मुकेशला बहिण नाही. त्यामुळे रक्षाबंधनला आपल्याला कुणीही राखी बांधली नाही याची खंत मुकेशला होती. मात्र “चिमुरड्या अफिफाला रक्तदान करून माझे रक्षाबंधन साजरे झाले” अशी भावना मुकेशने बोलून दाखवली. मी आफिफाला बहीण मानले असून आता दर महिन्याला तिच्यासाठी रक्ताची तजवीज करण्याची जबाबदारी उचलली आहे असे मुकेशने सांगितले. तसेच ज्यांनी अजून लस घेतली नाही त्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन मुकेशने सर्वांना केले आहे. मुकेश पाटील चे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे. आफिफाला रक्त मिळवून देण्यासाठी रेड क्रॉस आणि रेड प्लस या रक्तपेढींनी प्रयत्न केले.