नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सेवापटातील त्रुटी व आक्षेप यांची परिपुर्ण नोंदी न घेतल्याने त्रुटींची पुर्तता मुदतीत करुन सेवापट मंजुरीसाठी सादर केले जात नाही. त्यामुळे काही पोलिस अधिकारी व अंमलदारांची सेवापट मंजुरीसाठी पाठविले नसल्याने तेही प्रलंबित आहे. यासंदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनाला निवेदन देवुन देखील न्याय मिळत नसल्याने कोविड महामारी संपल्यानंतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार कल्याणकारी सेवाभावी संघटनेने बैठकीत घेतला आहे.
नंदुरबार येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीला संघटनेचे संचालक व सभासद उपस्थित होते. सदर बैठकीत सर्व विषयांवर महत्त्वपुर्ण चर्चा झाली. बरेच सेवापटमध्ये सुव्यवस्थित नोंदी व नियमाने वेतनवाढ न करता चुकीची वेतनवाढ लावल्याने पोलिस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या सेवापटात कार्यालयीन कर्मचार्यांच्या चुकीमुळे नियमाने निश्चिती नोंदी न केल्याने कर्मचार्यांची अतिप्रधानाची रक्कम वसुल करण्यात येत आहे. तसेच बरेच सेवापट हे निवृत्तीवेतन व लाभाची रक्कम वेळेवर मिळावी, यासाठी नियमाने सेवापट हे मुदतीत संबंधित कार्यालयाकडे सादर केले जात नाही. सेवापटातील त्रुटी व आक्षेप यांची परिपुर्ण नोंदी न घेतलेल्या सदर त्रुटींची पुर्तता मुदतीत करुन सेवापट मंजुरीसाठी सादर केले जात नाही. त्यातच काही पोलिस अधिकारी व अंमलदार त्यांचे सेवापट मंजुरीसाठी पाठविले नसुन ते अद्यापही प्रलंबित असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात येवुन चर्चा करण्यात आली. त्यामुळे वंचित असलेले अधिकारी व अंमलदार यांच्या सेवानिवृत्ती वेतन व लाभाची रक्कम मंजुरी आदेश मिळालेले नाही. तसेच १०, २०, ३० अशा तीन टप्पामधील लाभाचे वेतन श्रेणीतील जे कर्मचारी प्राप्त आहेत, त्यांना अद्याप लागु झालेली नाही. यासंदर्भात संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देवुन प्रत्यक्षात अडचणी मांडुन देखील त्या सोडविण्यात आल्या नाहीत. म्हणुन प्रलंबित मागण्यांसंदर्भात न्याय मिळावा, यासाठी कोविड-१९ महामारीचा काळ संपल्यानंतर संघटनेकडुन लोकशाही मार्गाने व भारतीय राज्यघटनेनुसार तीव्र आंदोलन करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. या बैठकीवेळी कोविड १९ चे नियमांचे पालन करण्यात आले.