नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा, ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ अन्वये सर्वात मोठया रकमेचा भारतातील प्रथम व ऐतिहासीक न्याय निर्णय देण्यात आला.
दोंडाईचा येथील के. एस. कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसला दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी आग लागली होती, या कोल्ड स्टोरेजचे मालकांनी नुकसान भरपाईपोटी २५ कोटी मिळावेत यासाठी न्यु इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडे दावा दाखल केला होता. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे कोल्ड स्टोरेजला आग लागल्याचा ठपका ठेवत विमा कंपनीने दावा नाकारला होता. त्यानंतर कोल्ड स्टोरेजचे मालकाने नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
सदर प्रकरणांचे कामकाज आयोगाचे अध्यक्ष संजय पी. बोरवाल, सदस्या श्रीमती भारती पी. केतकर आणि सदस्य मोहन एस. बोडस यांच्या समक्ष चालले. दोन्ही पक्षाचे युक्तीवादाअंती आगीच्या नुकसानी पोटी विमा कंपनीने भरपाई म्हणून २२ कोटी ५९ लाख ३९ हजार ७४५ रुपये नुकसान भरपाईचे देण्याचे आदेश न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला.
एवढेच नव्हे तर, मानसिक शारीरिक त्रास तसेच तक्रार अर्जाचा खर्च ३ लाख रुपये वेगळे द्यावे असेही निकालपत्रात म्हटले आहे.
तक्रारदार यांचेवतीने ॲड. रुपचंदानी यांनी कामकाज पाहिले.








