शहादा l
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इंद्रधनुष्य 2022 या युवक महोत्सवात शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयास पोस्टर मेकिंग स्पर्धेत सुवर्णपदक तर रांगोळी प्रकारात रौप्य पदक प्राप्त झाले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने दि. 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान के. के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक येथे इंद्रधनुष्य 2022 हा युवक महोत्सव संपन्न झाला. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या विविध कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातील एकूण 800 पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. एकूण 27 कला प्रकारात विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या.
त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी गिरीश सुनील जाधव याला पोस्टर मेकिंग कला प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले तर तृतीय वर्षाची विद्यार्थिनी वैष्णवी शैलेश धात्रक हिला रांगोळी स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाले. कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांतून नाशिक येथे यश प्राप्त केलेल्या या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी.सी. चौधरी व प्रा. दिलीप सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल व प्राध्यापक वृदाने अभिनंदन केले आहे