नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील रेशन दुकानातील चांगल्या भौतिक सुविधांबरोबरच शासनाचे नियमांचे तंतोतंत पालन करणार्या 22 रेशन दुकानाना जिल्हा पुरवठा शाखेने आयएसओ मानांकन दिले आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 12 तर शहादा तालुक्यातील 10 रेशन दुकानांचा समावेश आहे.
शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत समाजातील दारिद्र्य व गरीब कुटुंबांना अत्यंत माफक दरात रेशनचे धान्य दिले जात असते. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून 1064 स्वस्त धान्य दुकानाना शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
या रेशन दुकानांवर ग्राहकांना चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचीही ग्राहकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच शासनाने रेशन दुकानांना यंदापासून आयएसओ नामांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. या नामांकानासाठी शासनाने भौतिक सुविधा व शासनाचे 90 निकष लागू केले आहेत. सदर निकष पूर्ण करणारे नंदुरबार जिल्ह्यातील 22 रेशन दुकान पात्र ठरले असल्याने त्यांना आयएसओ नामांकन देण्यात आले आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 12 तर शहादा तालुक्यातील 10 रेशन दुकानांचा समावेश आहे.
शासनाने रेशन दुकानांसाठी इमारतीचे मध्यवर्ती ठिकाण जेणेकरून ग्राहकांना पायपीट करावी लागणार नाही, सभोवतालचे वातावरण, पक्की इमारत, त्यात पुरेशी हवा, लाईट, खिडक्या, पंखे हवे, दुकानाची रंगरंगोटी, प्रशस्त जागा, धान्याला कीड लागू नये म्हणून पेस्ट कंट्रोल, धान्याचे संरक्षण, उंदीर, घुस यांचा उपद्रव, पिण्याचा पाण्याची व्यवस्था, प्रथमोचार पेटी, दुकानाचे नाव, नंबर, दुकानदाराचा गणवेश, ऑनलाईन पेमेंट सुविधा, सुरक्षा अलार्म, अग्नी प्रतिबंधक यंत्र, दक्षता समिती बोर्ड, दुकानाची वेळ, भाव फलक, साठा नोंद वही, हेल्पलाईन नंबर, तक्रार नंबर, अभिप्राय नोंदवही असे वेगवेगळे निकष लागू केले आहेत








