शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या वतीने विचार मंथन सप्ताहानिमित्त ग्रामीण कृषि कार्यानुभव योजनेअंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे होते.मुख्य अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील,मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अल्पगिरी सीड्स गांधीनगर गुजरातचे कार्यकारी संचालक गिरीश पटेल, युनियन बँकेचे शाखाधिकारी मयूर पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना बँकेचे अनुदान बँकेच्या योजना आदींविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. मयूर पाटील यांनी बँकेच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी क्रेडिट कार्ड, कृषी सिंचन वित्त योजना, ड्रोन सहाय्य योजना आदींबाबत माहिती दिली. गिरीशभाई पटेल यांनी भविष्यातील कृषी तंत्रज्ञान व आव्हाने याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. अध्यक्षीय समारोपात मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांसोबतच परिसरातील शेतकरी बांधवांनी उत्पादन वाढीसाठी वेळोवेळी संपर्क साधून लाभ घ्यावा.
शेती संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची मदत घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. चंद्रशेखर पाटील यांनी केले.
दरम्यान, कार्यक्रमानंतर उपस्थित शेतकरी बांधवांनी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील विविध प्रात्यक्षिक पिकांना भेटी दिल्या. महाविद्यालयाच्या संग्रहालयाला भेट देऊन माहिती घेतली. शेती तंत्रज्ञान संदर्भात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांनाही भेट देऊन माहिती जाणून घेतली.या उपक्रमास समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्यासह विविध विद्या शाखांचे प्राचार्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले








