नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील ईश्वर अशोक साळुंखे हा तरुण मागील चार वर्षापासून पुण्यात कामानिमित्त रहायला आहे. त्याचे विविध प्रकारच्या कला प्रकारांवर प्रेम आणि त्यातलीच एक कला म्हणजे पेन्सिल स्केच. याच कलेच्या निमित्ताने तो २७ ऑगस्ट रोजी झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री सई म्हणजेच गौतमी देशपांडे यांना त्यांचे अनोखे पेन्सिल स्केच काढून एक आठवण भेट दिली.
गौतमी देशपांडे मॅकेनिकल इंजिनिअर असून यावेळी त्यांच्या विविध विषयांवर साधारणतः अर्धा ते पाऊणतास गप्पा रंगल्या. यात मराठी नाटक, गाणी, पुस्तक वाचन, मराठी लेखक आदी विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ‘माझा होशील ना’ या मालिकेचे शीर्षक गीत सोबत गायले आणि या गायनाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे ईश्वरने सांगितले. विशेष म्हणजे गौतमी देशपांडे या सुद्धा एक चांगल्या गायिका आहेत. म्हणून दोघांचे गप्पांचे सूर चांगलेच जुळून आले. शेवटी ईश्वरने त्यांना एक अहिराणी भाषेतील ओळ बोलायला सांगितली आणि त्या बोलल्या सुद्धा. ईश्वर म्हणतो की, ही भेट सदैव माझ्या लक्षात राहील.