नंदुरबार l
आजादी का अमृत महोत्सवा निमित्ताने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने 2 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत ‘फिट इंडिया फ्रीडम रन 3 कि.मी धावणे हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले असल्याने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र, स्काऊटस ॲण्ड गाईड, नेहरु युवा केंद्राचे युवक, एन.एस.एसचे विद्यार्थी, तसेच महाविद्यालयीन व शालेय विद्याथी, खाजगी संस्था, खेळाडूंनी या फिट इंडिया फ्रीडम रनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.
या उपक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त प्लॉग रनने केली जाईल. आणि त्यानंतर उर्वरित मोहिमेसाठी 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत हा उपक्रम चालणार आहे. यासाठी प्लॉग रन आयोजित करुन स्वच्छता आणि तंदुरुस्ती अशा दोन्ही बाबी साधावयाच्या आहेत. धावतांना, जॉगिग करतांना रस्त्यात दिसणारा, हाताने उचलता येईल असे कागदाचे कपटे,कचरा उचलुन कचऱ्यांच्या पिशवीत मध्ये गोळा करुन स्वच्छता करावयाची आहे.
या उपक्रमामागील संकल्पना तुम्ही कुठेही चालू शकता, कधीही पळु शकता अशी आहे. प्रत्येक जण धावण्यासाठी ,चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग व्यक्तिंश अनुकुल वेळ निवडू शकतो. तसेच आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्राती घेवूनही धावणे, चालणे करु शकणार आहे. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे, चालण्यासाठी मुभा असणार आहे. वर्क फ्रॉम होम घरात बसुन कामकाज करणारे युवक युवती,नागरिक व गृहिणी यांनी देखील फ्रीडम रन या उपक्रमात सहभागी व्हावे. ऑलिम्पियन खेळाडूंची टॉर्च रॅली आयोजित करण्यात यावीत.
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील प्रमाणे ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा. गुगल क्रोमवर फिट इंडिया फ्रीडम रन या वेबसाईटवर माहिती भरावी. उपरोक्त डेटा स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलद्वारे किंवा ॲपद्वारे अपलोड करावी.
माहिती अपलोड केल्यावर यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ईमेलद्वारे प्राप्त होईल. सहभगी झालेल्या व्यक्तींनी धावलेले, चाललेले अंतर, मॅरेथॉन फिट इंडिया पोर्टलवर www.fitindia.gov.in नोंद करावी. ‘फिटनेस का डोस आधा घंटा रोज’ हा उपक्रम राबविण्यात यावा. धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. त्यास नेहमी तंदुरुस्ती नियमित व्यायामाची आवश्यकता असते.
यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी आणि सर्वाना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 कि.मी धावणे ही चळवळ राबविण्याचे केंद्रशासनाने कळविले आहे. तरी या उपक्रमात अधिकाधिक नागरिक, कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी, खेळाडूनी सहभाग घेवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन श्रीमती. पाटील यांनी केले आहे.








