तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा गावात भर लोकवस्तीत बिबट्याचा मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.२३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या ९ ते १० वाजेच्या सुमारास मोहन संभु पटेल यांच्या घराजवळील गल्लीतून चक्क बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आहे. या आगोदर बिबट्याचा संचार हा शेत शिवारात दिसून येत होता. तसेच चार ते पाच दिवसापूर्वी चिनोदा गावातील छोटूलाल काळू पटेल यांच्या घरामागे बांधलेल्या गायीचे वासरूला पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून फस्त केले होते.
त्यामुळे भर लोकवस्तीत बिबट्याचा मुक्त संचाराने चिनोदा ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी चिनोदा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.