नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात लहान मुलांना पळविणारी टोळी असल्याचा मॅसेज सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने पोलिसांकडून या प्रकाराची पडताळणी करण्यात आली. अशी कुठल्याही प्रकारची टोळी सक्रीय नसून या केवळ अफवा असल्याचे निदर्शनास आले असून यापुढे सोशल मिडीयात मॅसेज व्हायरल केल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गेल्या पाच सहा दिवसांपासून जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन देखील अलर्ट झाले असून त्यांनी याबाबतची संपुर्ण पडताळणी केली असता, अशा प्रकारची कुठलीही टोळी सक्रीय नसल्याचे समोर आले आहे.
यापुढे जो कोणी सोशल मीडियावर अशा प्रकारचे मॅसेज व्हायरल करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, त्याच्यावर सायबर अॅक्ट नुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा पोलिसांनी दिला आहे.
या बाबत पोलिसांच्या संदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरत आहे , या अफवांची पोलीसांनी शहानिशा व सखोल चौकशी केली असता ह्या अफवा तथ्यहीन व खोट्या असल्याच्या खात्री झाली आहे . शाळा , महाविद्यालय परिसरात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली आहे . पोलीस यंत्रणा सतर्क असून या संदर्भातील काही जुने किंवा इतरत्र घडलेल्या घटनांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत . मात्र त्याचा नंदुरबार जिल्ह्याशी काहीही संबंध नाही , असे व्हिडिओ विनाकारण व्हायरल करू नयेत . जर कोणी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल .
आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी , घर , गल्ली , परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती , संशयास्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाणेस त्वरित कळवावे . तसेच कोणीही संशयास्पद समजून कोणत्याही व्यक्तीला मारहाण करु नये , अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये पोलीसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.