नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यासह अक्कलकुवा तालुक्यातदेखील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेल्या सौरप्लेट व इतर साहित्य ग्रामस्थांनी पकडून पोलिसांकडे जमा केले. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने
अक्कलकुवा तालुक्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असे असताना सिंदुरी ग्रामपंचायत हद्दीत २४ सप्टेंबर रोजी पिकअप टेम्पो (क्रमांक एमएच २० एल ८०९०) क्रमांकाच्या वाहनाने सौरऊर्ज प्लेटा, बॅटऱ्या, पंखे, लाईट, पाइप वायर लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी साहित्य नेले जात होते. मोलगी गावातील पिंपळखुंटा चौफुलीवर सदर टेम्पोला थांबवून जागृत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यास कळवून टेम्पो चालकासह पोलिसांचा स्वाधीन केले.याबाबत लेखी तक्रार त्याच दिवशी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तळोदा, तहसीलदार अक्कलकुवा यांचाकडे नुरजी वसावे, लालसिंग खिमजी वसावे, दिनेश मुंगा वसावे, रमेश खुमा वसावे, सिंगा धर्मा वसावे या कार्यकर्त्यांनी करून कडक कारवाईची मागणी केली.
या प्रकाराचीही चौकशी करण्याची मागणी जि.प. सदस्य सी. के. पाडवी, मांगीलाल सोना पाडवी, ॲड. सरदारसिंग वसावे, वनसिंग शंकर शिंदे, गणुजी शिवाजी तडवी, सागर पाडवी, जितेंद्र रणजितसिंग पाडवी, दाजला किता राऊत, जेकमसिंग तडवी यांनी केली आहे.