नंदुरबार l प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…चा जयघोष करीत मंगळवारी सकाळी नंदुरबार आगारातून अष्टविनायक दर्शनयात्रा बस रवाना झाली. गणरायाची प्रतिमा आणि आकर्षक फुलमाळा तसेच फुग्यांनी सजविलेली बस भाविकांचे आकर्षण ठरली.नंदुरबार तालुक्यातील भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अष्टविनायक दर्शन सेवा यात्रेची पहिली बस मंगळवारी सकाळी रवाना करण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाअंतर्गत विभागीय नियंत्रक विजय नवनाथ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार आगारातर्फे अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माफक दरात शिर्डी व अष्टविनायक दर्शनसह श्रीक्षेत्र देवगड दत्तमंदिर येथे भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
मंगळवारी सकाळी 6:45 वाजेला एम. एच. 13 सी.यु.8465 क्रमांकाच्या बस सेवेचा प्रारंभ प्रतापपूर (ता.तळोदा) येथील सेवानिवृत्त शिक्षक व जेष्ठ नागरिक जयकृष्ण नथू पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. आगार प्रमुख मनोज पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.नंदुरबार अष्टविनायक दर्शन यात्रा बस शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, निमंत्रित सदस्य सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बी. डी.गोसावी,
नितीन पाटील, आगार प्रमुख मनोज पवार, चालक एस. एस. भास्करे, एस. एम. महाजन, वाहतूक निरीक्षक रमेश वळवी, सहाय्यक वा.निरिक्षक सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रक एस. टी पवार, हितेश वसईकर, भाविक- ,चतुर पाटील, आदि उपस्थित होते.यात्रे दरम्यान देवदर्शनासह पर्यटन स्थळांना भेट देणार असल्याचे आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले. सदर यात्रा दि. 20 ते 23 सप्टेंबर अशी चार दिवसांची राहणार आहे. पहिल्या बसमध्ये तीसहून अधिक प्रवासी भाविक चौपाळे गावातील आहेत.नंदुरबार आगाराच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.
आगामी काळात अष्टविनायक दर्शनसह पंढरपूर अक्कलकोट आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सारख्या विविध पर्यटन स्थळांसाठी स्वतंत्र यात्रेचे नियोजन आहे.याकरिता सर्व शासकीय विभाग अधिकारी, कर्मचारी, शहर आणि तालुक्याचे सर्व नागरिक, पत्रकार बंधू, अभियंते, वकील, डॉक्टर्स, शिक्षक प्राध्यापक , व्यावसायिक, व्यापारी, सामाजिक संघटना तथा राजकीय पदाधिकारी बंधू भगिनी यांनी देखील स्वतः आणि आपल्या परिवारातील सदस्यासाठी आताच बुकींग करून जास्तीत जास्त प्रमाणात या संधीचा लाभ करून घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.








