नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे व सफाई कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासनाची पुर्ती न केल्यामुळे पालिका कार्यालयात उद्या दि .२७ ऑगस्ट रोजी भाजपातर्फे ‘ कचराफेक ‘ आंदोलन करण्यात येणार आहे.यामध्ये सफाई कामगारांसह नागरिक सहभागी होणार असून याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी महेश चौधरी यांना भाजपातर्फे देण्यात आले आहे .
या निवेदनात म्हटले आहे की , नवापूर नगरपालिकेत आरोग्य विभागात मागील १० ते १५ वर्षापासून कंत्राटी पध्दतीने ७० ते ७५ सफाई कामगार कार्यरत होते . मात्र गेल्या १ महिन्यापासून सदर सफाई कामगारांना पालिकेने कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकले आहे आणि त्यांना ४५ दिवसांचे मानधनसुद्धा अदा केलेले नाही . सदर कामगारांना न्याय मिळावा यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता प्रशासकीय कारणे दाखविण्यात आली.यानंतर दि .१८ ऑगस्ट रोजी भरत गावित यांच्या नेतृत्वात भाजपातर्फे व सफाई कामगारांच्या उपस्थितीत पालिका प्रशासनाला लेखी निवेदन दिल्यानंतरही पालिकेने असर्मथता दर्शविली . मात्र नवापूर नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सफाई कामगारांना थकित वेतन व त्यांना ३ दिवसात कामावर सामावुन घेण्याचे मौखिक आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले होते . यावेळी आंदोलन तुर्त स्थगित केले होते . मात्र अद्यापही सफाई कामगारांना थकित वेतन अदा केलेले नाही व त्यांना कामावर सामावून घेतलेले नाही . शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत . या सर्व बाबीसाठी पालिका प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे . घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सफाई कामगारांचा १८ जुन रोजी करार संपल्यावर केवळ १ महिन्याची वाढीव मुदत संबधित ठेकेदाराला देण्यात आली . त्यानंतर पालिका प्रशासनाने ७० ते ७५ सफाई कामगारांना कोरोना काळात बेरोजगार केले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . यामुळे पालिका कार्यालयात उद्या दि .२७ ऑगस्ट रोजी ‘ कचराफेक ‘ आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे . निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत , जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत , प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख , नगरसेवक महेंद्र दुसाने , तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे , तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल , दिनेश चौधरी , शहराध्यक्ष प्रणव सोनार , अजय गावीत , माजी नगरसेवक रमला राणा , माजी नगरसेवक सुनिता वसावे , जिग्नेशाबेन राणा , घनश्याम परमार , गोपी सैन , हेमंत शर्मा , संदिप पाटील , कुणाल दुसाणे , शारुक खाटीक , राज सोनी , समीर दलाल , अनिल दुसाने , तोसिफ मन्सुरी आदींच्या सह्या आहेत .