नंदुरबार l प्रतिनिधी
‘ब्रेक द चेन’ च्या प्रक्रीयेंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू नागरिकांना दि.15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून आतापर्यंत 2 लाख 55 हजार 613 थाळ्या नि:शुल्क देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. अशावेळी शासनाने गरजू नागरिकांना एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा कालावधी वेळोवेळी वाढविण्यात आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यात आतापर्यंत 27 हजार 751, अक्राणी 31 हजार 282, नंदुरबार 88 हजार 775, नवापूर 36 हजार 321, शहादा 34 हजार 626 आणि तळोदा तालुक्यात 36 हजार 858 थाळ्या नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोना कालावधीत प्रत्येक केंद्राच्या इष्टांकातही दीडपट वाढ केल्याने जिल्ह्यातील 16 शिवभोजन केंद्रांवरून दररोज 2550 थाळ्या वितरीत होत आहेत.
राज्य शासनाने गरीब आणि गरजू व्यक्तींना अल्पदरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी 26 जानेवारी 2020 पासून केवळ दहा रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नंतर थाळीचे शुल्क 5 रुपयापर्यंत कमी करण्यात आले. दुसऱ्या लाटेच्यावेळी कडक निर्बंध असल्याने 15 एप्रिलपासून ही थाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
योजनेच्या प्रारंभापासून आतापर्यंत एकूण 7 लाख 86 हजार 673 थाळ्यांचे वितरण करण्यात आले असून त्यापैकी 2 लाख 55 हजार 613 थाळ्या नि:शुल्क, 5 लाख 14 हजार 412 थाळ्या 5 रुपये शुल्क आकारून आणि 16 हजार 648 थाळ्या दहा रुपये शुल्क आकारून वितरीत करण्यात आल्या आहेत.
योजनेंतर्गत 26 जानेवारी 2020 पासून अक्कलकुवा तालुक्यात 90 हजार 263, अक्राणी 96 हजार 455, नंदुरबार 2 लाख 62 हजार 93, नवापूर 1 लाख 6 हजार 250, शहादा 1 लाख 13 हजार 986 आणि तळोदा तालुक्यात 1 लाख 17 हजार 626 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. एकूणच शिवभोजन थाळी संकटकाळात गरजू व्यक्तींना दिलासा देणारी ठरली आहे. आता 14 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर ही थाळी मोफत देण्यात येणार आहे.