नवापूर | प्रतिनिधी-
आदिवासी जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने व रुग्णांवर तात्काळ औषधोपचार करण्यासाठी अंजने (ता. नवापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे अश्या मागणीचे पत्र माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी आज आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले.
माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नवापूर तालुक्यात आदिवासी लोकवस्ती असून अंजने, बिलदा, जामदे, वासदा, बिलबारे, चिखली, देवलीपाडा, तारपाडा, सोनारे दिगर, कोकणीपाडा, तारापूर, बंधारे, भांगरपाडा व सोनारे अशा एकूण १४ गावांचा समावेश आहे. या गावांची लोकसंख्या जवळपास साडे अठरा हजार इतकी आहे. या गावांमध्ये कुपोषण, बालमृत्यु, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तसेच सिकलसेलग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोनाची लागण होऊ नये किंवा झाल्यास रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळपास रुग्णालय नाही. त्यामुळे नवापूर तालुक्यातील अंजने या मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता आहे. आदिवासी जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने व रुग्णांवर तात्काळ औषधोपचार करण्यासाठी अंजने (ता. नवापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे.अशी मागणी माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी केली आहे.