मोलगी l प्रतिनिधी:
सर्जा राजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सातपुड्यातील मनवाणी ता. धडगाव येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
बैलपोळा सर्वत्र मोठ्या थाटात साजरा होत असला तरी सातपुड्यात मात्र हा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मनवला जातो. पोळ्यानिमित्त खरीप हंगामातील शेतीकामांनी ग्रासलेले तथा उत्सवप्रिय आदिवासी बांधव थकवा घालवतात. प्रत्येक शेतकऱ्यांकडून सकाळीच बैलांची पुजा केली जाते. त्यानंतर संपुर्ण सकाळीच केवळ मनवाणी ता. धडगाव येथेच साजरा होणाऱ्या बैलपोळा उत्सवाला गुजरात व मध्य प्रदेशातूनही आदिवासी बांधव हजेरी लावतात. पोळ्यानिमित्त मनवाणीत बाजार भरत असून ढोल ताशे व पारंपरिक नृत्यही सादर केले जाते. त्यामुळे सातपुड्यातील बांधवांना यंदाच्या पोळ्याची उत्सुकता लागली होती. परंतु कोरोना महामारीमुळे अवघा सातपुडा संवेदनशील बनला आहे. करोनाचे संकट लक्षात घेता यंदाच्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर मनवाणी येथील ग्रामस्थ व धडगाव तालुका पोलीस प्रशासनामार्फत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंदाचा बैलपोळा साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचा ठराव घेण्यात आला. शिवाय परंपरेनुसार ढोल ताशा व नृत्य सादर केले जाणार नाही. त्यामुळे सातपुड्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील बांधवांनी मनमानी येथे पोळ्यानिमित्त उपस्थित राहू नये, असे आवाहन या बैठकीद्वारे धडगाव तालुका पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी केले आहे. धडगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस कांस्टेबल पुष्पेंद्र कोळी, मनवाणीचे सरपंच गुलाब सिंग राहसे, पोलीस पाटील रामा वळवी, नायलीबाई वळवी, काकड्या पुंजारा, लोब्या राहसे, भिगजा रामसे, रायसिंग राहसे, गिरीश वळवी, रायसिंग वळवी, सुमित तडवी, चमाऱ्या राहसे आदी उपस्थित होते.