नंदुरबार l प्रतिनिधी
दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि आगळे वेगळे उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम राखली आहे.
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दरवर्षी पर्यावरणपूरक शाडूमातीपासून गणरायाची मूर्ती बनवणारे दर्शन आर्ट्सचे मूर्तिकार दर्शन सोनार यांचा यंदा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बी.डी.गोसावी यांच्या हस्ते मूर्तिकार दर्शन सोनार यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या आगळ्यावेगळ्या सत्काराने भारावून गेल्याची प्रतिक्रिया दर्शन सोनार या युवा मूर्तीकाराने व्यक्त केली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा करण्यात आला.
विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या मानाचे व नवसाचा श्री दादा गणपती मूर्ती देखील दर्शन सोनार या मूर्तिकाराने साकारली आहे.
यावेळी दर्शन सोनार यांच्या हस्ते शहीद शिरीष कुमार मित्र मंडळाच्या श्री गणरायाची आरती करण्यात आली. प्रसाद वाटपानंतर उपस्थित महिला भाविकांनी हळदी कुंकू समारंभ केला.
कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गणेशोत्सव समिती अध्यक्ष गोपाल हिरणवाळे, सिद्धेश नागापुरे, विशाल हिरणवाळे, आणि बालवीर चौक, नवा भोईवाडा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








