नंदूरबार । प्रतिनिधी
कासारे ता.साक्री येथे एका कार्यक्रमात राज्याचे बंदरे व खणीकर्म मंत्री ना. दादा भुसे हे काल जिल्हा दौर्यावर आले असता त्यांना शेतकर्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. कांदाप्रश्नी आक्रमक झालेल्या शेतकर्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत पन्नास खोके, मंत्री ओके अशा घोषणा दिल्या. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान त्या शेतकर्यांची समजूत काढण्यात आली.
साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आज ना. दादा भुसे हे आले होते. विकास कामांचे लोकार्पण सुरू असतानाच अचानक काही शेतकर्यांनी ना. दादा भुसेंना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. कांद्याला हमी मिळावा व कासारे ते नामपूर रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
संताप व्यक्त करणार्या शेतकर्यांना ना.भुसे यांनी जवळ बोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघावे, असे त्यांनी सुचविले. कांद्याला भाव मिळत नाही.
शेतकर्यांचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अद्याप साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नसल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर ना. भुसे यांनी आंदोलक शेतकर्यांना मंचावर बोलवून त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांची समजूत काढली.








